१८९ साकार निराकार ब्रह्मीचे विकार
साकार निराकार ब्रह्मीचे विकार ।
तेथील अंकुर गुरुराज ॥ १ ॥
रज तम नाहीं सात्विक तेही ।
परिपूर्ण देहीं आत्माराम ॥ २ ॥
सर्वघटवासि सर्वत्रनिवासी ।
आपण समरसीं बिंबलासें ॥ ३ ॥
निवृत्तिची खुण गुरूचा उद्गार ।
सर्व हा निर्धार आत्माराम ॥ ४ ॥
सरलार्थ:
साकार निराकार ब्रह्माचे विकार । तेथील अंकुर गुरुराज ॥१॥ त्या आत्मानंदाच्या सखोल डोहांत रजतम व सत्वगुणहि नाही त्या देहांत आत्मारामच परिपूर्णत्वाने भरलेला आहे. ।।२।। सर्व भूतांच्या देहरूप घरात राहणारा व सर्वदेश-विदेश व्यापून असणारा तो श्रीहरि आपणहूनच एकरूप होऊन साकार झाला आहे ।।३।। गुरुकृपेने उद्धार होणे हीच निवृत्तिची खूण- सिद्धांत आहे. हा आत्मारामच त्याचा निश्चय आहे ।।४॥
भावार्थ:
सगुण व निर्गुण होणे हे त्या परब्रह्माचे स्वरुप आहे हे गुरुनी सांगितले आहे. ज्या देहात रज व तम नाहीत तो सात्विक देह असतो व त्या परिपुर्ण देहात आत्माराम असतो. ते परब्रह्म सर्व शरिरात विराजत असते व ते स्वप्रकाशाने बिंबत असते. त्या सर्वत्र असणाऱ्या आत्मारामाला पाहण्यासाठी श्री गुरु गहिनीनाथांच्या तोंडातुन निघालेल्या शब्दातुन खुण सापडते.