१९५ एक तत्त्व सांगती वेदादिक बडिवार
एक तत्त्व सांगती वेदादिक बडिवार ।
ब्रह्म कर्म आचार भजनालागीं ॥। १ ॥
आदिमध्य अवसान सत्व रज तम ।
प्रकृति सर्वत्र संपत्ति आकारला ।।२।।
सोहं पै अनंतु सेवितां साचार ।
गुरुमार्गेसाचार भजन केलें ।।३।।
देवीं नांदे रसना धर्मी नांदे भावो ।
एकतत्त्वीं देवो क्षरला असे ।।४।।
आदिअंत हरपला नाहीं तेथे कल्पना ।
देहीं दीप भाना विठ्ठलचरणीं ।। ५ ।।
याचेनि परिपाठें नासतील पापें ।
एक नाम सोपें हरिचें जाणा ॥ ६ ॥
निवृत्ति साम्यता सर्वाघटीं दिसतु ।
विठ्ठल हेचि मातु नित्य नेम ।।७।।
सरलार्थ:
वेद शास्त्रे त्या एक तत्त्वाचा मोठेपणा सांगतात. त्याच्या सेवेकरिता ब्रह्मस्वरूप कर्माचा आचार सांगतात ।।१।। तो परमात्मा प्रकृतिद्वारा रज, सत्व व तम या तीन गुणाद्वारा उत्पत्ति, स्थिती व लय या रुपाने साकार झाला आहे ।।२।। त्या अनंत श्रीहरिचे सोहं या बोधाने नित्य सेवन करण्यासाठी गुरुमार्गाची सत्य वाट धरली आहे ।।३।। देवाच्या नामात वाणी तर त्याच्या धर्मात मनाचा भाव नांदत आहे. मात्र दोन्ही ठिकाणी एकच तत्त्व साकारले आहे ।।४।। आरंभ, शेवट या कल्पना त्याठिकाणी नाहिशा होऊन देहातील ज्ञानदीप विठ्ठलाच्या पायीच स्थिरावला आहे ।। ५ ।। याच्या चिंतनाने सर्व पापे नाहिशी होतात व ते एकच अतिशय सोपे आहे ।।६।। निवृत्तिस ते स्वरुप सर्वाभूति समत्वाने दिसते व तो विठ्ठल विठ्ठल हाच जप सतत नियमपूर्वक करतो ।।७।।