१९६ मनाची वासना मनेंचि नेमावी

मनाची वासना मनेंचि नेमावी ।
सर्वत्र धरावी विठ्ठल सोय ॥ १ ॥
आपेंआप निवेल आपेंआप होईल ।
विठ्ठलचि दिसेल सर्वरूपी ॥ २ ॥
साधितां मार्ग गुढ वासना अवघड ।
गुरुमार्गी सुघड उपरती ॥ ३ ॥
निवृत्ति वासना उपरति नयना ।
चराचर खुणा हरि नांदे ॥ ४ ॥

सरलार्थ:

मनाची वासनाहि मनानेच आवरून सर्व ठिकाणी एक विठ्ठलच आहे अशी भावना धरावी ।।१।। मग ते मन आपोआपच शांत होईल व आपोआपच ते रामरूप होईल व सर्वठिकाणी विठ्ठल परमात्माच दिसेल ।।२।। वासना नाहिशी करण्याचा हा गुह्य-गुप्त मार्ग साध्य करतांना कठीण आहे. मात्र गुरु आश्रयाच्या मार्गाने ही वासनाशांतीची उपरती सोपी आहे ।।३।। निवृत्तिच्या वासनेची उपरति-शांती होऊन डोळ्यांना चराचर विश्वात श्रीहरिचेच रूप नांदत आहे असे दिसू लागले ।।४।।

भावार्थ:

मनातील वाईट इच्छा मनातच संपवुन सर्वत्र भरुन असलेल्या विठ्ठलाला मनात धरले की मन वासनारहित होते. हे सर्व करायला सोपे आहे फक्त विठ्ठलाचे स्मरण केले की वासना आपोआप निमतील व विठ्ठल मनात आपोआप स्थापित होईल काही गुढ इच्छा परमार्थ करताना त्रास देतात पण गुरुमार्गी वैराग्य साधना केली की त्या निघुन जातात. निवृत्तिनाथ म्हणतात, माझ्या डोळ्यांना तर चराचरात व्यापक असलेला हरि पाहायची वासना लागली आहे.

Leave a Reply 0

Your email address will not be published. Required fields are marked *