१९८ दिननिशीं नाहीं अवघा दीपक
दिननिशीं नाहीं अवघा दीपक ।
एक रूपें त्रैलोक्य बिंबलेसे ॥ १ ॥
तें रूप सांगतां नये पैं भावितां ।
गुरुगम्य हाता एक तत्त्वें ॥ २ ॥
सांडावे पैं कोहं धरावें पै सोहं ।
अनेकत्व बहु एकतत्त्वी ॥ ३ ॥
निवृत्ति साचार वैकुंठीचे घर ।
देह हें मंदीर आत्मयाचें ॥ ४ ॥
सरलार्थ:
दिवस व रात्र नाही असा संपूर्ण प्रकाशच अशा एकरूपाने हे त्र्यैलोक्य आकाराला आले आहे ।।१।। ते श्रीहरिचे रूप वाचेने सांगता येत नाही व मनाने त्याची भावनाहि कल्पनाहि करता येत नाही. तर ते एकतत्त्व गुरुद्वाराच हाती येते ।।२।। मी कोण आहे हा संशय दूर करून सोहं-तो मी आहे असा निश्चय करावा व या अनेक रुपाने नटलेल्या जगात एक रूप अहंभाव धरावा ।।३।। (सर्वं खलु इदं ब्रह्म) ते वैकुंठ स्वरूप श्रीहरिचे स्थान निवृत्तीस प्राप्त झाले आहे. त्यामुळे देह हे देवाचे मंदिर झाले आहे ॥४॥
भावार्थ:
त्या ब्रह्मदिपकाच्या जवळ दिवस रात्र हा भेद नाही तो सतत प्रकाश देतो.तोच ज्ञान प्रकाशाने एकरुपाने त्र्यैलोकात व्यापुन आहे.गुरुच्या शिकवणीवर विश्वास ठेवला तर तो अनुभवता येतो अन्यथा त्याचे वर्णन अशक्य आहे. स्वतःतील कोहमचा मी सोडुन सोहं शिवाचा अंगिकार केला तर अनेकत्वामध्ये एकत्व साधता येते. निवृत्तिनाथ म्हणतात, सकळ वैकुंठ साचार होऊन त्याचे ह्या देहातच घर करुन त्या मंदिरात आत्मारामाची स्थापना करता येते.