०१० नित्य हरिकथा नित्य नामावळी
नित्य हरिकथा नित्य नामावळी ।
वैष्णवांचे कुळीं धन्य जन्म ॥ १ ॥
म्हणोनि पंढरी उपजवावें संसारीं ।
प्रत्यक्ष श्रीहरी तीरीं उभा ॥ २ ॥
नित्यता दिवाळी नाहीं तेथें द्वैत ।
नित्यता अच्युत तिष्ठतसे ॥ ३ ॥
निवृत्ति सादर विष्णुमय सार ।
विठ्ठल आचार पंढरिये ॥ ४ ॥
सरलार्थ:
जेथे नित्यनेमाने हरिकीर्तन व अखंड नामस्मरण होते अशा वैष्णवांच्या कुळांत जन्म होणे हे श्रेष्ठत्वाचे लक्षण आहे. ।।१।। म्हणूनच या मृत्युलोकी पंढरी क्षेत्रातच जन्म घ्यावा जेथे साक्षात श्रीहरि चंद्रभागेच्या काठावर उभा आहे. ।।२।। म्हणून तेथे सततच अद्वैत आत्मसुखाची दिवाळी असून द्वैताचा लवलेशही नाही. श्रीहरि अच्युत प्रभु भक्तांची वाट पाहत उभा आहे. ।।३।। त्या साररूप विष्णु-विठ्ठलरूपाचे ठिकाणी निवृत्तिचा आदर आहे कारण सर्वाभूती सम, निर्वैर, निरपेक्षता हा विठ्ठलाचा आचारधर्म भागवतधर्म पंढरिक्षेत्रांत आहे. ।।४।।
भावार्थ:
ज्या घरात नित्य हरिकथा व नामसंकीर्तन होते आशा वैष्णवाच्या कुळात जन्म मिळणे भाग्याचे आहे. म्हणुनच जीवाला हे सर्व ज्या पंढरीत हे होते त्या क्षेत्री जन्म घ्यावसा वाटतो. ज्या ठिकाणी श्री विठ्ठल उभा आहे तिकडे आनंदाची दिवाळी असते व द्वैत नसते. निवृत्तिनाथ म्हणतात श्री विठ्ठलाच्या रहिवासामुळे सर्व जगत विष्णुमय झाले आहे.