२०५ सप्त पाताळें एकवीस स्वर्गे पुरोनि उरला हरि
सप्त पाताळें एकवीस स्वर्गे पुरोनि उरला हरि ।
काया माया छाया विवर्जित दिसे तो आहे दुरी ना जवळी गे बाईये ॥ १ ॥
प्रत्यक्ष हरितो दाविपा डोळां ।
ऐसा सद्गुरु कीजे पाहोनि ।
तनु मन धन त्यासि देऊनी ।
वस्तु ते घ्यावी मागोनि गे बाईये ॥ २ ॥
पावाडां पाव आणि करी परवस्तुसि भेटी ।
ऐसा तोचि तो ।
सद्गुरुविण मूढासि दर्शन कैचें ।
ऐसा तोचि चमत्कारु गे बाईये ॥ ३ ॥
एक मंत्र एक उपदेशिती गुरु ।
ते जाणावे भूमिभारु ।
निवृत्ति म्हणे तत्त्व साक्षित्वें दावी ।
ऐसा तोचि चमत्कारु गे बाईये ॥ ४ ॥
सरलार्थ:
तो श्रीहरि परमात्मा सात पाताळ लोक, एकवीस स्वर्ग लोकास पुरून उरला आहे. अगबाई शरीर, माया व तिचे प्रतिबिंब हे जग असे, काया, माया व छाया आभासात्मक जीव व शीव तेथे दिसत नाही. तो दूर किंवा जवळ आहे असे नाही ।।१।। अग बाई तो श्रीहरि डोळ्याला प्रत्यक्ष दाखवील असा विचार करून सद्गुरू करावा व त्यांस तन, मन, धन हे सर्व कांही देवून ती परमात्म वस्तु मागुन घ्यावी ।।२।। जो पायवाटेने परवस्तुची भेट करून देतो अशा सद्गुरूकृपे वांचुन मूर्खमाणसास आत्मदर्शन होणे हा एक चमत्कारच म्हणावा लागेल ।।३।। कांही गुरू मंत्र देतात. काही उपदेश करतात. ते गुरू नसून भूमिला भार आहेत. निवृत्तिनाथ म्हणतात ते परमात्मतत्त्व प्रत्यक्ष दाखवितो तोच श्रीगुरुहा खरा चमत्कार आहे. अग बाई हे तू समजून घे ।।४।।
भावार्थ:
एकविस स्वर्ग व सप्त पाताळा भरुन तो हरि उरला आहे. त्या काया, माया व छाया नाहीत तो निर्गुण आहे. तो लांब ही नाही व जवळ ही नाही. सदगुरुकृपे मुळे तो हरि प्रत्यक्ष पाहता आला. त्याला तन मन धन सर्वकाही देऊन ती परमात्म वस्तु मागुन घेता येते. पावाडा म्हणजे झाडावर चढण्यासाठी पाय ठेवायला केलेली खाच, जसे झाडावर त्या पावाड्यातुन पाय देऊन चढणारे इच्छित फल प्राप्त करतात. तसाच तो आहे. व सदगुरुवाचुन म्हणजे सदगुरुने केलेल्या पावाड्या मधून त्या परमात्मारुपी झाडावर चढ़ता येते हे एक आश्चर्यच आहे. जे लोक गुरुने दिलेला मंत्र न जपता इतर मंत्र जपतात ते भूमीला भार असतात. निवृत्तिनाथ म्हणतात, श्री गुरुमुळे ते तत्व साक्षीत्वाने दिसते ते ही एक आश्चर्यच आहे.