२१४ साधक बाधक न बाधी जनक

साधक बाधक न बाधी जनक ।
सर्व हरि एक आम्हां असे ॥ १ ॥
हरिविण नाहीं हरिविण नाहीं ।
हरि हेंचि पाही एकरूप ॥ २ ॥
हरिमाझा जन हरि माझें धन ।
हरि हा निर्गुण सर्वांठायीं ॥ ३ ॥
निवृत्ति हरिलीळा दिनकाळ फळला ।
निमिशोनिमिषकळा हरिजाणे ॥ ४ ॥

सरलार्थ:

सर्व विश्वाचा जन्मदाता हा श्रीहरि सर्व एक असून आत्मत्वाने या सृष्टित आहे. तो एवढा तटस्थ-कूटस्थ-निर्विकार आहे की, कोणाला साधक व कोणाला बाधकहि होत नाही (“समोऽहं सर्व भूतेषु न मे द्वेष्योऽस्तिप्रियः।”) व त्यालाहि कोणी बाधा करू शकत नाही ॥१॥ (हरिशिवाय काहीही नाही. सर्वत्र एकरूप श्रीहरिच भरलेला आहे. सर्वाभूती समचि मी नाही शत्रुमित्र मज। प्रेमीभक्त माझे ठायी मीहि तेथे समग्र असे ।।) ।।२।। तोच सर्वठिकाणी एकरूपाने वास करीत आहे. त्या हरिमध्येच जन व धनहि असून तो सर्व ठिकाणी निर्गुण स्वरूपांत आहे ।।३।। निवृत्तिस हरिलीला सततच फलद्रुप झाली. प्रत्येक प्राणिमात्रांच्या डोळ्याची उघडझाप करण्याची युक्ति तो हरिच जाणतो ।।४।।

भावार्थ:

तो हरि आमचा झाल्या पासुन अनुकुल प्रतिकुल साधक बाधकता आम्हाला बांधु शकत नाही. हरिविण दुसरे काही आम्ही पाहात नाही तोच हरि एकत्वाने आम्ही पाहतो. सर्वाठायी निर्गुण असणारा तो हरी माझे जन ही आहे व धन ही आहे. निवृत्तिनाथ म्हणतात, त्या हरिलीलेने प्रत्येक क्षणची कळा हरिमय झाली.

Leave a Reply 0

Your email address will not be published. Required fields are marked *