०११ प्रारब्ध संचित विठ्ठलदैवत
प्रारब्ध संचित विठ्ठलदैवत ।
कुळीं उगवत भाग्ययोगें ॥ १ ॥
तें रूप पंढरी उभें असे सानें ।
त्रिभुवनध्यान वेधियेले ॥ २ ॥
उगवली ज्योति प्रभा पैं फाकती ।
नाहीं दीनराती पंढरीये ॥ ३ ॥
प्रभात हरपे सायंकाळ लोपे ।
दिननिशी लोपे विठ्ठलप्रभा ॥ ४ ॥
पृथ्वी हे ढिसाळ वायु व्योमफळ ।
सेविती अढळ जोडती रया ॥ ५ ॥
निवृत्ति सप्रेम जोडती सर्व काळ ।
पंढरी ये राम विश्रामले ॥ ६ ॥
सरलार्थ:
प्रारब्ध संचिताच्या भाग्याने श्रीविठ्ठल हे दैवत आमच्या कुळातच प्रगट झाले. ।।१।। (विठ्ठलभक्तिचा भाग्योदय झाला) विठ्ठलाचे ते लहानसे रूप पंढरित विटेवर उभे आहे. त्याने तिन्ही लोकांचे ध्यान वेधून घेतले आहे. ।।२।। ती प्रकाशरूप ज्योत उदयास आल्याने पंढरिक्षेत्रात दिवस व रात्रीचे काम राहिले नाही. (एवढी प्रभा पसरली आहे) ।।३।। तेथे झालेला प्रातःकाळ हरपून जातो व सायंकाळ या वेळेचाहि लोप होतो व दिवसरात्र त्या विठ्ठलाच्या प्रकाशाने नाहीसे होतात. ।।४।। पृथ्वी हि पोकळ व वायु हे आकाशाचे कार्य म्हणजे फळ आहे. ते याची सेवा करून शाश्वत पद प्राप्त करून घेतात. ।।५।। निवृत्तिहि प्रेमाने सर्वकाळ तेथेच रमला आहे कारण त्या पंढरीत श्रीरामच विश्रांती पावले आहे. ।।६।।
भावार्थ:
अनेक जन्माच्या संचित व प्रारब्धामुळे भाग्य योगाने श्री विठ्ठल भक्ताच्या कुळात जन्म मिळतो.सगुण रुपाने पंढरीत साकार झालेल्या रुपाने त्रिभुवनाचे ध्यान वेधले आहे. ह्या आत्मज्योतीच्या तेजप्रभेमुळे दिनरात्रीचे भास पंढरीत होत नाहीत. ह्या विठ्ठलाच्या प्रभेमुळे सकाळ संध्याकाळ लोप पावतात. श्री विठ्ठलाच्या सेवे मुळे पृथ्वीचे जडपण वायु चे विचरण व आभाळाचा आभास स्थिरावतो. येथेच प्रभु श्रीरामाने येऊन समाधीरुपाने विश्रांती घेतली तो श्रीराम मला प्राप्त झाला असे निवृत्तिनाथ म्हणतात.