२२१ प्रपंचाची वस्ति व्यर्थ काह्या काज
प्रपंचाची वस्ति व्यर्थ काह्या काज ।
आम्हा बोलतां लाज येतसये ॥ १ ॥
काय करूं हरि कैसा हा गवसे ।
चंद्र सूर्य अवसे एकसूत्र ॥ २ ॥
तैसें करूं मन निरंतर ध्यान ।
उन्मनि साधन आम्हां पुरे ॥ ३ ॥
निवृत्ति परिपाठ हरिनाम हेचि वाट ।
प्रपंच फुकट दिसे आम्हां ॥ ४ ॥
सरलार्थ:
अग सये-मैत्रिणी, आता प्रपंचाचे वास्तव्य निरर्थकच काय कामाचे. आम्हाला प्रपंच विषयक बोलणेहि लाजेचे झाले आहे ।।१।। हा श्रीहरि कसा सांपडेल ? या करिता काय करू ? कारण याच्या स्वरूप स्थितीत चंद्र सूर्याची अमावस्या – नाहिसे झाले. दोघांचीहि एकच गति झाली. ।।२।। मनाने नित्य आम्ही तसेच ध्यान करू उन्मनीचा आनंद देणारे हे नाम साधन आम्हाला पुरे आहे ।।३।। निवृत्तिचा अभ्यास असे हरिनाम हाच मार्ग असून त्यापुढे प्रपंच हा खोटा दिसत आहे ।।४।।
भावार्थ:
मायेच्या पटला मुळे भासमान होणारा अज्ञानी प्रपंचात काय म्हणुन राहयचे हे बुध्दीरुप सखी त्या विषयी बोलताना ही लाज वाटते. जसे चंद्र सूर्य आवसेला एकसुत्र होतात तसे त्या ब्रह्मरुपाला मिळवण्यासाठी जीव ला त्याच्याशी एकरुप व्हावे लागेल. त्यासाठी उन्मनी अवस्थेत त्याचे चिंतन मनन करणे हेच साधन आहे निवृत्तीनाथ म्हणतात माझा इरिनामाचा परिपाठ असल्यामुळे तो प्रपंच फुकाचा वाटतो.