०१२ सर्वकामधन सर्वसिद्धिपूर्ण
सर्वकामधन सर्वसिद्धिपूर्ण ।
पतीतपावन हरि एक ॥ १ ॥
तें रूप पंढरी पुंडलिका वोळलें ।
आणूनि ठेविलें भीमातीरीं ॥ २ ॥
नलगती त्या सिद्धि करणें उपाधी ।
नित्य चित्तशुद्धि विठ्ठलनामें ॥ ३ ॥
कळिकालासि त्रास चित्तीं ह्रषिकेश ।
उगवला दिवस सोनियाचा ॥ ४ ॥
त्रिभुवनीं थोर क्षेत्र पैं सार ।
विठ्ठल उच्चार भीमातीरीं ॥ ५ ॥
निवृत्ति तत्पर निवाला सत्वर ।
नित्यता आचार विष्णुमय ॥ ६ ॥
सरलार्थ:
सर्वकामनांचे धन व सर्व सिद्धिंची पूर्णता आणि पापी जनांना पावन करणारा एक श्रीहरिच आहे. ।।१।। त्याचेच रूप पंढरीत पुंडलिकास प्रसन्न झाले व त्याने ते भीमानदीच्या तीरावर आणून ठेवले. ।।२।। त्याला कोणत्याहि साधनांची सिद्धी व उपाधी लागत नाही. विठ्ठलाच्या नामानेच चित्ताची शुद्धता होते. ।।३।। चित्तात तो इंद्रियांचा स्वामी प्रगट झाल्याने काळदूतास भीति उत्पन्न होते व आपल्या जीवनांत सोन्याचा सुखाचा दिवस उगवतो. ।।४।। सर्वसार श्रीहरिविठ्ठल पंढरीत आल्याने ते क्षेत्र त्रैलोक्यात मोठे झाले आहे व तेथे भीमातिरावर एक विठ्ठल नामाचाच उच्चार-गजर होत आहे. ।।५।। त्या नामी सावध असलेला निवृत्ति तो त्वरीत शांत झाला आहे व त्याचा नित्य आचार धर्म विष्णुरूपच झाला. ।।६।।
भावार्थ:
ह्या विठ्ठल स्वरुपात सर्व धन व सिध्दि असुन ह्यांचा मुळे पतित ही पावन होतो. ते परब्रह्म सगुण रुपात पुंडलिकांने भीमातीरी उभे केले. आता अनेक इतर साधन न करता त्या विठ्ठलनामामुळे चित्त शुध्द होते. चित्तत जर विठ्ठल धारण केला तर कळीकाळास धाक होतो असा सोन्याचा दिवस भक्तास प्राप्त होतो. विठ्ठल नामाच्या गजर भीमातीरी झाल्यामुळे ते तीर्थ सर्व त्रिभुवनात श्रेष्ट ठरते. निवृतिनाथ म्हणतात हे जगत विष्णुस्वरुप आहे ह्या त्यांच्या अनुभवामुळे त्यांना शांती मिळाली आहे.