२२७ द्वैताचा दुकाळ अद्वैताच्या देशी
द्वैताचा दुकाळ अद्वैताच्या देशी ।
प्रपंच उपवासी मेला रया ॥१॥
नाहीं नाहीं चाड इंद्रियांचे कोड ।
कृष्ण हेंचि वाड हृदयीं आम्हां ।।२।।
देहाचा दिवटा अखंड पै कळा ।
निरंतर सोहळां कळी नोहे ।।३।।
निवृत्ति परम निरंतर सम ।
सर्वांघटी राम बिंबलासे ॥४॥
सरलार्थ:
अरे राजा ! अद्वैताच्या जगात द्वैताचा दुष्काळ पडल्याने संसार उपवासाने मेला आहे. त्याची उपासमार झाली आहे ।।१।। आता तेथे इच्छा व इंद्रियांचे कोडकौतुक मुळिच नाही. आमच्या हृदयात कृष्ण हीच मोठी वस्तु आहे ।।२।। आम्ही आवडीने देहाचा अखंड दिवा करून त्या आत्मकलेचा सोहळा सेवीत आहोत ।।३।। निवृत्तिस ते परमतत्त्व सततच सम आहे. सर्व देहांत एक रामच साकारला आहे ॥४॥