२२८ आदिमध्य अन्ती तुजमाजी बिंबवो
आदिमध्य अन्ती तुजमाजी बिंबवो ।
ब्रह्मी ब्रह्मथावो लवणजळीं ॥१॥
तैसें जालें ज्ञान उन्मनि उलथा ।
प्रपंच पालथा निमालिया ।।२।।
रिगु निगु काज जाले तुझें घरीं ।
अवघाचि संसार कळला आम्हा ।।३॥
गोप्य गुजराज उमजलासे हरी ।
दिसे अभ्यंतरी आत्माराम ।।४।।
न दिससि ज्ञाना तुझ्या देहीं राम ।
घेतला विश्राम ऐसें दिसे ।।५।।
निवृत्ति निवांत समरसें पाहत ।
अवघाचि दिसत देहीं विदेहीं ।।६।।
सरलार्थ:
आरंभी, मध्ये व शेवटी आत्मस्वरूप तुझ्यामध्ये बिंबले आहे साकारले आहे. ब्रह्माचा ठाव ब्रह्मस्वरूपातच जळलवण या न्यायाने घेतला आहे ।।१।। तसे उन्मनीत उलटणारे ज्ञान झाले. त्यामुळे प्रपंच पाठमोरा होऊन नष्ट झाला ।।२।। प्रवेश करणे व त्यातून निघणे हे तुझे धैर्याचे काम झाले. आम्हाला सर्व संसार समजुन आला ।।३।। गुह्यांचा राजा असा गुप्त हरि आम्हाला समजला. तो आत्माराम आत बाहेर दिसत आहे ।।४।। देहातच असलेला आत्माराम ज्ञानाने जागृत नाही. त्या संबंधी तू विश्रांती घेतोस असे दिसते ।।५।। निवृत्ति मात्र निवांत-शांतपणे एकरूप होऊन पाहात आहे व तो त्यांस देहांत व देहातीत स्थितीत दिसत आहे ॥६॥