२३१ आम्ही किरण तू सूर्य
आम्ही किरण तू सूर्य ।
आम्ही अस्तु तूं उदयो ॥१॥
कैसा देहीं देवो दिवटा ।
परापश्यंती चारी वाटा ।।२।।
आम्हीं कळा तूं चंद्रमा ।
तू अमृत आम्ही गरिमा ।।३।।
आम्हीं निधि तूं निधान ।
आम्ही ध्येय तूं साधन ॥४॥
निवृत्ति उपरती वाहे ।
हृदयीं कृष्णनाम ध्याये ॥५॥
सरलार्थ:
आम्ही किरणे असून देवा तू सूर्य आहेस त्यामुळे आमचा अस्त होऊन तुझा उदय होतो ॥१॥ हा देव रुपी दिवा देव्हाऱ्यातच बरा तेवत आहे. व परा पश्यंती मध्यमा वैखरी या चार वाचांनी तो प्रकाशमय आहे ।।२।। आम्ही कळा असून तू चंद्र व आम्ही अमृत असून तो गोडवा आहे ।।३।। आम्ही सांठा असून तू ठेवा आहेस आम्ही ध्यान-साधन तर तू ध्येय आहे ।।४।। निवृत्तिस ही उपरति होऊन तो कृष्ण रुपाचे ध्यान करीत आहे ॥५॥