२३५ ध्यान ना उन्मनी दृढना बंधनी
ध्यान ना उन्मनी दृढना बंधनी । सर्वां सर्वं पूर्ण हरि एकु ॥ १ ॥
वेदाचा वेदकु शास्त्रांचा विवेकु । श्रुति परलोकु हरि आम्हां ॥ २ ॥
उगवलें क्षेत्र पिकते घोळत । तैसे हैं अनंतरुप दिसे ।। ३ ।।
निवृत्ति चोखाळ गयनीप्रसाद । श्रीरंग गोविंद दिधला मज ॥ ४ ॥
सरलार्थ:
आता गुरूकृपेने ध्यान व उन्मनी व दृढात्मज्ञान बोध वृत्ति बंधनहि राहिले नाही. सर्व वस्तुमध्ये सर्व सर्वांगाने परिपूर्ण एक श्रीहरिच झाला आहे ।।१।। वेदाचा वेदक-वेद जाणणारा व सहाशास्त्रांचा विचार उपनिषदे, परलोक हे सर्व आम्हास हरिच झाले आहे. शेतात उगवलेले बिज पिकाच्या रूपाने अनंत दिसते. तसे हा एकच श्रीहरि आम्हाला अनंत रूपाने दिसत आहे. निवृत्तिस शुद्ध असा गहिनी प्रसाद होऊन त्यांनी मला श्रीरंग श्रीहरिच दिला आहे. ।।४।।