२५६ मीपण कळले तूपण सांडिले
मीपण कळले तूपण सांडिले । कल्पनें तोडिलें मुळींहुनीं ।। १ ।।
मूळ तें नुगवे फळ तें निमाले । हरि हे घेतलें जीवन हेतु ॥ २ ॥
जाला पैं सरता हरिनाम पाठें । नेतसे वैकुंठ गुरुकृपा ॥ ३ ॥
निवृत्ति गयनीं नाम नारायणीं । अखंडता ध्यानीं रामनाम ॥ ४ ॥
सरलार्थ:
मी पण हा आत्मत्वाने कळला व तू पणा हा टाकून दिला आणि कल्पना हि मुळापासून तोडून टाकली ।।१।। आता जे मूळ आहे ते उगवत नाही व फळ आहे ते नाहिसे झाले. जीवनाचे मूळ स्वरूप हरि तेच घेतले ॥२॥ हरिनामाच्या मोलाने मी सरता – पात्र झालो. गुरू कृपाच मला वैकुंठास नेते || ३ || गहिनीचा निवृत्ति नारायणाचा रामनाम ध्वनी अखंड काढत आहे. ।।४।।