२७३ हरिविण भावो तो वायाचि संदेहो
हरिविण भावो तो वायाचि संदेहो । हरिदेवा देवो आहे सत्य ॥ १ ॥
हरिविण वाचे ऐसें जप साचे । नाहीं त्या यमाचे मोहोजाळ ।। २ ।।
हरिविण सार नाहीं पै निर्धार । हरिविण पार न पविजे ।। ३ ।।
निवृत्ति श्रीहरि चिंतिता निरंतरी । हरियेकु अंतरी सर्वां नांदे ॥ ४ ॥
सरलार्थ:
एका श्रीहरि वांचून दुसरा भाव म्हणजे व्यर्थच संशय आहे एक हरि हाच सत्य देव आहे ।। १ ।। एका हरि वांचुन ज्याच्या वाचेला सत्य असे काहीच नाही त्याला यमाचा मोहपाश मुळीच नाही ।। २ ।। हरिवांचुन दुसरे सारच नाही, हरिशिवाय संसाराच्या परतीरास जाता येणार नाही. असा ज्याचा निश्चय आहे || ३ || श्रीनिवृत्तिनाथ म्हणतात – श्रीहरिचे निरंतर चिंतन केले असता संपूर्ण अंतरात एक हरिच नांदतो -प्रगट होतो ।।४।।