२७७ समत्वसुखाचे विषममोहाचे
समत्वसुखाचे विषममोहाचे । द्वैत पापाचें घेसी झणीं ॥ १ ।।
समसेज बाज सर्वत्र रे भोगी । एकरूप जगीं हरि नांदे ॥ २ ॥
स्वरुप सुलभ हरि माझा लाठा । नामेंचि वैकुंठा नेतु असे ।। ३ ।।
निवृत्ति दिवटा सर्वकाळ जपे । वैकुंठ सोपें एक्यानामें ॥। ४ ॥
सरलार्थ:
विषयसुखाचे समत्व – सुख व मोहाचे दुःख व द्वैताचे पाप कदाचित घेशील ।।१।। त्यापेक्षा सर्वसम आहे या समबुद्धिच्या बाजेवर सेजसुख भोग म्हणजे सुखाने झोप घे. कारण या भेदाने भरलेल्या जगात एकमेव श्रीहरिच नांदत आहे. ॥२॥ स्वरुपाने सोपा व सामर्थ्याने बलवान असा माझा श्रीहरि नामानेच वैकुंठास नेतो. ।। ३।। जो हरिनाम दिवा निवृत्ति सर्वकाळ जपतो. एका नामानेच वैकुंठ सोपे आहे ॥४॥