२७९ हरिविण भाव तो सर्वचि व्यर्थ
हरिविण भाव तो सर्वचि व्यर्थ । हरि हा समर्थ भाव थोर ।। १ ।।
रामकृष्णनाम हाचि थोर उच्चार । भावाभाव सार एका नामें ।। २ ।।
नित्य नाम घोष उच्चारितां वाचे । यम काळ साचे वंदी तया ।। ३ ।।
निवृत्ति स्मरतु रामनाम भाव । सर्व एक देव चाड आम्हां ॥ ४ ॥
सरलार्थ:
एका हरिवांचून दुसरा भाव हा सर्वच व्यर्थ आहे. श्रीहरि हाच समर्थ व श्रेष्ठभाव आहे. ।।१।। रामकृष्ण नामाचे उच्चारण सर्व श्रेष्ठ आहे. सर्व भावामध्ये साररूप भाव एक हरिनामच आहे. ।।२।। हरिनामाचा वाचेने नित्यघोष केला असता यमकाळ त्याला वंदन करतो ||३|| निवृत्ति रामनामाचे भावाने स्मरण करीत असून सर्वत्र व्यापक असलेल्या श्रीहरिचीच आम्हा इच्छा आहे. ।।४।।