२८३ उपरति मनाची साधन विदेही
उपरति मनाची साधन विदेही । तरिजेल बाही रामनामें ॥ १ ॥
हरिवीण सुटिजे ऐसें नाहीं बोलिलें । सर्वहि शोधिले शास्त्र आम्हीं ॥। २ ।।
द्वैताची हे वाढी प्रपंचाच्या घरीं । अद्वैत कामारी भोगिजेसु ।। ३ ।।
निवृत्तिचे सार हरि हरि निर्मळ । साधन केवळ हरि पाठें ॥ ४ ॥
सरलार्थ:
या रामनामाने मन वासनारहित होते व ते विदेहस्थितिचेहि साधन होते आणि संसार सागर स्वबाहुने तरून जातो ||१|| आम्ही सर्व शास्त्र शोधून पाहिले तरी हरिवांचुन संसारपाशातून कोणी सुटले असे त्यांनी सांगितले नाही || २ || या प्रपंचाच्या पसाऱ्यात द्वैताचीच वाढ होते. तू हरिनामाने अद्वैताचा कामाठी म्हणून उपभोग करून घे ||३|| निर्मळ असे हरिचे नाम हेच निवृत्तिचे सार आहे. केवळ हरिपाठ हेच मोक्षाचे साधन आहे ||४||