२८४ एकाविण दुजे नाही पै ये सृष्टी
एकाविण दुजे नाही पै ये सृष्टी । हें ध्यान किरीटी दिधले हरी ।। १ ।।
नित्यता श्रीहरी जनीं पै क्षरला । द्वैताचा अबोला तया घरीं ॥ २ ॥
हरिविणें देवां नाहीं दुजा जनीं । अखंडपर्वणी हरि जपतां ।। ३ ।।
निवृत्ति साकार हरिनामपाठ । नित्यता पै वाट हरिपाठें ॥ ४ ॥
सरलार्थ:
या सृष्टित एका श्रीहरिवाचून दुसरी वस्तुच नाही ही दृष्टि अर्जुनास देवाने गीतेत दिली. ।। १ ।। एक श्रीहरि जनामध्ये नित्यच भरलेला आहे. त्याच्या स्वरूपात द्वैताची भाषाच नाही ||२|| हरिवांचुन दुसरा देव या जगात मुळीच नाही ही पर्वणी अखंड हरिजपल्यानेच साध्य होते || ३॥ निवृत्तिच्या ठिकाणी साकारलेला हरिनामाचे स्मरण ही नित्य अशा वैकुंठाची वाट आहे. ।।४।।