२८८ समता धरा आधी टाका द्वैतबुद्धि
समता धरा आधी टाका द्वैतबुद्धि । आपेआप शुद्धि गोविंदी रया ॥ १ ॥
सम नांदे हरि विषय अघोरीं । निवृत्ति चराचरीं सांगतुसे ॥ २ ॥
समशेजबाज सम केशिराज । समतुष्टे भोज आत्मराज ।। ३ ।।
निवृत्तिचे धन अखंड परिपूर्ण । आपणचि नारायण तुष्टे सदा ॥ ४ ॥
सरलार्थ:
अहो राजे हो तुम्ही अगोदर समभावना धरा व द्वैतभावना टाकून द्या मग आपोआपच गोविंदास प्राप्त होण्याची शुद्धता येईल. ॥१॥ मनो निग्रहात हरि नांदत असतो तर अघोर स्वैर कर्मात दुःख भोगावे लागते हे निवृत्ति सर्व चराचर विश्वास सांगत आहे. ।।२।। मनाची एकाग्रता हेच विश्रांन्ति स्थान असून तेच केशिराज श्रीहरि स्वरूप आहे. तो आत्मराज त्याच आवडीने संतुष्ट होतो. ।। ३ ।। अखंड परिपूर्णत्व हेच निवृत्तिचे धन असून त्याने नारायण स्वतः सदैव संतुष्ट होतो. ।।४।।