०२० काळवेष दुरी काळचक्र करीं

काळवेष दुरी काळचक्र करीं ।
बाह्य अभ्यंअती हरि नांदे ॥ १ ॥
सर्वत्र श्रीकृष्ण नंदाघरीं जाला ।
कृष्णें काला केला गोपवेषें ॥ २ ॥
गोपाळ संवगडे खेळे लाडेकोडे ।
यशोदेमाये पुढें छंदलग ॥ ३ ॥
निवृत्तिम्हणे तो स्वामी सकळांचा ।
दिनकाळ वाचा कृष्ण जपों ॥ ४ ॥

सरलार्थ:

काळाचे नाटक-सोंग ज्याच्यापासून दूर आहे व काळचक्रच ज्याच्या स्वाधीन आहे अर्थात जो देश व कालातीत आहे असा तो श्रीहरि आंत बाहेर नांदत आहे. ।।१।। सर्वत्र असलेला श्रीकृष्ण नंदाच्या घरी आला व त्याने गोपाळा बरोबर काला केला. ।।२।। बरोबरचे सोबती अशा त्या गोपाळाबरोबर कोड कौतुकाने खेळतो व यशोदेमातेकडे बाल छंद हट्ट धरून बसतो. ।।३।। निवृत्तिनाथ म्हणतात तो सर्वांचा मालक आहे. नित्य प्रतिदिन त्याच्या कृष्ण या नामाचा वाणीने जप करू. ।।४।।

भावार्थ:

नामसाधनेने हृदयात स्थापित झालेला हरि आत बाहेर राहुन भक्ताचे काळचक्रापासुन रक्षण करतो. चराचर भरुन राहिलेला भगवंत नंदाघरी गोपवेश घेऊन काला करित आहे. लडिवाळपणे यशोदामातेसमोर आपल्या गोपाळांबरोबर अनेक खेळ खेळतो. निवृत्तिनाथ म्हणतात तो सर्व जगाचा राजा असुन त्याचे दिवसरात्र नाम जपु.

Leave a Reply 0

Your email address will not be published. Required fields are marked *