३०४ पितृपिता हरि पूर्वज पुरातन
पितृपिता हरि पूर्वज पुरातन । नाम नारायण पांडुरंग ।। १ ।।
तो ध्यायिजे जना अद्वैत वासना । द्वैताची भावना दुरी करीं ।। २ ।।
वेदाचा अर्थ पाहतां समर्थ । तोचि हा भरीत कृष्णराजु ।। ३ ।।
निवृत्तिचा जपु गयनी समीप । सर्व कृष्णरूप गुरु माझा ॥ ४ ॥
सरलार्थ:
हरि हा पित्याचा पिता, आजोबा असून पुरातन असा पूर्वजहि आहे व त्याचे नाव पांडुरंग-नारायण असे आहे ।।१।। जनामध्ये अद्वैत भावना ठेवून त्याचे ध्यान करावे व द्वैतभावना दूर सारावी ।।२।। वेदाचा सर्व अर्थ पाहिला असता तोच कृष्णराज सर्वत्र भरलेला आहे हाच आहे ।।३।। निवृत्तिचा हाच जप गुरू गहिनी जवळ आहे. माझे गुरू गहिनी हे सर्व कृष्णरूपच आहेत ।।४।।