३०७ भक्ति ज्ञान वैराग्य तिहीचे शोधन
भक्ति ज्ञान वैराग्य तिहीचे शोधन । जनीं जनार्दन हेंचि खरें ॥ १ ॥
भक्तिविण देव नपवे सावेव । रोहिणीची माव तैसा दिसे ॥ २ ॥
वैराग्ये तापलें ब्रह्मांड देखिलें । वासने मुंडले निःसंदेहे ॥ ३ ॥
निवृत्ति ज्ञानार्क विज्ञान सम्यक । भावशीळ देख जनीं इये ॥ ४ ॥
सरलार्थ:
भक्ति ज्ञान व वैराग्याने शोध घेतला असता जनामध्ये जनार्दन आहे हेच सत्य आहे || १ || भक्तिवांचून देव साकार स्वरूपांत प्राप्त होणार नाही. एहवी तो रोहिणीच्या सदैव मृगजळाप्रमाणे भासतो ।।२।। वैराग्याने तापल्याने ब्रह्मांड पाहिले तर ते नि:संशय वासनेचे मुंडण केल्या सारखे दिसते ||३|| निवृत्ति ज्ञान सूर्याचा उत्तम अनुभव या जगात भावशील मनाने भगवंत पाहतो असा भक्तिज्ञान व वैराग्याचा श्रीहरि शोध आहे ॥४॥