०२१ नाहीं यासि गोत नाही यासी कूळ
नाहीं यासि गोत नाही यासी कूळ ।
शेखीं आचारशीळ कोण म्हणे ॥ १ ॥
बाळरूपें हरि गोकुळीं लोणी चोरी ।
त्या यशोदा पाचारी थान द्यावया ॥ २ ॥
सोंवळा हरि वागवी शिदोरी ।
तो गोपालांच्या करी काला देतु ॥ ३ ॥
निवृत्ति संपूर्ण काला देतु जाण ।
ब्रह्मसनातन गोकुळींचें ॥ ४ ॥
सरलार्थ:
या श्रीकृष्णाला कुळ व गोत्र दोन्हीही नाहीत तर मग शेवटी यास आचारवान आहे असे कोणी म्हणावे. ।।१।। बाळवेषांत हा श्रीहरि गोकुळात लोणी चोरतो व यशोदा त्यास स्तनपान करण्यास हांक मारते. ।।२।। पवित्र-शुद्ध असा हा श्रीहरि पदरांत शिदोरी वागवतो व गोपाळांच्या हातात तो काला देतो. ।।३।। हे गोकुळातील सत्य-शाश्वत संपूर्ण ब्रह्म काला गोपाळांना वाटते याचे रहस्य जरूर जाणून घ्यावे. ।।४।।
भावार्थ:
एको हं ह्या वेदवाक्यानुसार हे परमतत्व एकटे आहे त्यामुळे त्यास कुळ व नाती नाहीत. तो अकर्तुम असल्याने तो कर्म करतो असे कसे म्हणता येईल. हा परमात्मा गोकुळात एकीकडे लोणी चोरत असताना दुसरीकडे पान्हा अनावर झाल्यामुळे यशोदा त्यास स्तनपानासाठी बोलवत असे. पण सत्वगुणी सोज्वळ शिदोरी ही हा परमात्मा बाळगतो व त्यातील काला गोपाळांच्या हाती खायला देतो. निवृत्तीनाथ म्हणतात गोकुळीच्या ह्या ब्रह्मसनातनाने आपला स्वस्वरुप काला गोपाळांना वाटला.