०२२ गोपाळ संवगडे आले वाडेकोडें
गोपाळ संवगडे आले वाडेकोडें ।
असंख्य बागडे हरिरूपीं ॥ १ ॥
बिंबली पंढरी हरीरूपीं सार ।
अवघाचि श्रृंगार विठ्ठलराजु ॥ २ ॥
कालया कौशल्या नामदेव जाणे ।
तेथीलीहे खुणे निवृत्तिराजु ॥ ३ ॥
ज्ञानदेव सोपान जगमित्र नागा ।
नहरहि वेगा झेलिताती ॥ ४ ॥
वैकुंठ सांवळे मजि भक्त मेळे ।
काला एक्या काळें करिताती ॥ ५ ॥
निवृत्ति संपूर्णता घेउनि उद्गारु ।
सेविता उदार हरिराणा ॥ ६ ॥
सरलार्थ:
श्रीकृष्णा समवेत खेळणारे ते असंख्य गोपाळ गडी मोठ्या कौतुकाने आले व ते देवा बरोबर खेळु बागडू लागले. ।।१।। त्यामुळे पंढरिचे बिंब ठसा जगभर उमटला कारण सर्वांचे सार रूप श्रीकृष्णच आहे आणि हा विठ्ठलराज तर सर्वांगाने श्रृंगार-सुंदर आहे. ।।२।। कालिया मर्दनाचे चातुर्य श्री नामदेवच जाणतात व त्यातील वर्म श्री निवृत्तिनाथानांच माहित आहे. ।।३।। ज्ञानदेव, सोपान, जग मित्र नागा व नरहरि सोनार हे त्वरेने तो चेंडू झेलतात. ।।४।। त्या भक्त समुदायांत ते सावळे वैकुंठ विराजत होते व ते सर्वजण एकाच वेळी काला करत असतात. ।।५।। त्या पूर्णत्वाच्या काल्याचा गजर करून तो उदारांचा राजा श्रीहरि सेवन करू लागला. ।।६।।
भावार्थ:
श्रीकृष्ण अवतारामुळे त्याचे भक्त त्याच्या प्रेमामुळे गोपवेष घेऊन त्याच्या भोवती अवतरले आहेत. सगळे अलंकार लेऊन हाच परमात्मा पंढरीत विठ्ठल स्वरुपात अवतिरण झाला आहे व पंढरी त्याच्या सार रुपात रंगली. ह्याच्या प्रेमभक्तीने रंगलेले नामदेव, निवृत्तिनाथ त्याची खुण ओळखतात. ह्याने उधळलेला एकात्म काला ज्ञानदेव, सोपान जममित्र नागा, नरहरी सोनारांदी संत वरच्यावर झेलतात. मध्याहच्या वेळेवर एकाच वेळी एका ठिकाणी हा एकात्म काला सावळा रंग घेतलेले परब्रह्म भक्तांच्या मेळ्यात वाटत असते. निवृतिनाथ म्हणतात आम्ही केलेल्या नामरुप प्रेमभक्ती मुळे तो परमात्मा संतुष्ट झाला व त्यांने कृपा करुन माझा संपुर्ण उध्दार केला.