३२७ एकरूपे असे भेदरूपे भासे
एकरूपे असे भेदरूपे भासे । ज्ञानियासी कैसे एकतत्त्व ।। १ ।।
तत्त्वता श्रीहरी एक असे सर्व । सांडूनी देहभाव पूर्ण पाहा ॥ २ ॥
देवेंविण कोठें रितें नाहीं सर्वथा । संपूर्ण पुरतां हरि आहे ।। ३ ।।
निवृत्तिची खुण एकतत्त्वरूपें । पाहातां सोहपें गुरुखुणें ॥ ४ ॥
सरलार्थ:
हे परमात्मतत्त्व एक रूपात आहे व अनेक रूपाने भासते ज्ञान्यांना ते एक तत्त्वानेच अनुभवास येते ।। १ ।। तत्त्वतः तो श्रीहरिच सर्व एकमात्र आहे हे दहतादात्मभाव टाकून पूर्ण अनुभवावे- पहावे ।। २ ।। देवावांचुन कोठेहि रिकामे ठिकाण मुळीच नाही संपूर्णात्वाने तो पूर्ण भरलेला आहे ।। ३ ।। एकच तत्त्व ही निवृत्तिची खूण असून श्रीगुरुकृपेने ते पाहिल्यास फार सोपी आहे ।। ४ ।।