३३६ गोविली चरणी टाकिली सांडणी
गोविली चरणी टाकिली सांडणी । विषय पारणी दुरी ठेली ।। १ ।।
पाहाट पाहली ब्रह्म उगवली । दिननिशी जाली एकरूप ॥ २ ॥
नाहीं तारा ग्रह नाहीं ते मेदिनी । सर्व जनार्दनी बिंबलेंसे ।। ३ ।।
निवृत्ति निकट ब्रह्म सर्व घट । अवघाचि निघोट राम आम्हां ॥ ४ ॥
सरलार्थ:
आता माझी चित्तवृत्ति श्रीहरिच्या चरणी गोवल्यामुळे वासनेची सांडसी टाकली गेली व विषयवासना पुष्ट करणे दूर राहिले ।।१।। ब्रह्माच्या उगवण्याने पहाटेचे उजाडले गेले व दिवसरात्र एकच झाले आहे ॥२॥ आता तेथे तारांगणे ग्रह नक्षत्रादि व पृथ्वीही नाहिसी झाली सर्व सर्व हे जनार्दनानेच साकारले आहे ||३|| निवृत्तिजवळ सर्वस्वरूप ब्रह्माचा अनुभव असून आम्हाला सर्व रामच परिपूर्णत्वाने झाला आहे ।।४।।