०२४ तंव आनंदला हरि परिपूर्ण लोटला
तंव आनंदला हरि परिपूर्ण लोटला ।
मुक्ताई लाधला प्रेमकवळु ॥ १ ॥
चांगयाचे मुखीं घालीत कवळू ।
आपण गोपाळु दयासिंधु ॥ २ ॥
दिधलें तें तूं घेई पूर्ण तें होई ।
सप्रेमाचे डोही संतजन ॥ ३ ॥
नामया विठया नारया लाधलें ।
गोणाई फावलें अखंडित ॥ ४ ॥
राही रखुमाई कुरवंडी करिती ।
जिवें वोंवाळिती नामयासी ॥ ५ ॥
निवृत्ति खेंचर ज्ञानदेव हरि ।
सोपान झडकरी बोलाविला ॥ ६ ॥
सरलार्थ:
तेव्हा श्रीहरिस अति आनंद झाला व तो सर्वांगाने प्रसन्न झाला व पुस मुक्ताबाईस तो प्रेमाचा घास मिळाला. ।।१।। तो भक्तिचा घास दयासागर फाव गोपाल श्रीकृष्ण स्वरूप श्रीपांडुरंगाने चांगदेवाच्या मुखात घातला. ।।२।। गुरू मुक्ताई ने जे दिले ते तू घे व जीवनात पूर्ण हो. सर्वच संत समुदाय त्या तूंचि प्रेमरूप काल्याच्या डोहात बुडून गेले. ।।३।। तोच प्रेम काला मग श्रीनामदेव, त्याची मुले विठा, नारा या सर्वांस लाभला इतकेच काय त्या खरो गोणाईस हि तो नित्याचाच मिळाला. ।।४।। राही, रुखमाई मग नामयावरून निंबलोण करून जीवाभावाने त्यास ओवाळू लागल्या. ।।५।। निवृत्तिनाथ विसोबा खेचर, श्रीविठ्ठल व ज्ञानदेव आणि सोपानास ताबडतोब बोलवणे केले. ।।६।।
भावार्थ:
काल्याच्या आनंदात देहभान हरपलेला परमात्मा भक्तांच्या स्वाधिन झाला व त्यांने मुक्ताईला प्रेमाने काल्याचा घास भरवला. तो दयासागर गोपाळ चांगयाच्या तोंडात काल्याचा घास घालत आहे. भगवंत प्रेमाने म्हणाला की पूर्णत्वाचा काला घेऊन तुम्ही संत पूर्णतेला पोहचाल. व हे ऐकुन संत आनंदाच्या डोहात डुंबु लागले. नामदेव त्यांचे चिंरजीव विठ्ठल, नारायण आई गोणाई ह्यांना ही काल्याच्या आनंदात भाग घेता आला. प्रेमाने राहि रखुमाईनी प्रेमाने नामदेवांना औक्षण केले. निवृत्तिनाथ म्हणतात की देवांने मला, ज्ञानदेव, सोपान, व विसोबा खेचरांना आवर्जुन प्रेमाने त्वरित बोलावुन घेऊन त्यांना काल्याचा लाभ दिला.