३४० प्रथम अक्षर क्षरलेसे साचार
प्रथम अक्षर क्षरलेसे साचार । तेंचि चराचर बिंबलेसें ।। १ ।।
अर्जुनीं क्षरला अक्षर संचला । विश्वरुपे अबोला एकातत्त्वें ।। २ ।।
आत्मा हा अविट बिंबलासे नीट । स्मरतांची पै वैकुंठ देतु आम्हां ।। ३ ।।
निवृत्ति प्रतिमा अक्षरीं दिन व्योमा । एकतत्त्वीं सीमा ध्यायेजेसु ॥ ४ ॥
सरलार्थ:
सृष्टिचे पहिले अक्षर जो ओंकार तो सत्यत्त्वाने प्रगट झाला व तेच पहिले अक्षर मग चराचरविश्वरूपाने साकार झाले ॥१॥ तेच अक्षर पुढे पाझरून अर्जुनाचे ठिकाणी संक्रमित झाले व आपल्या एकतत्त्व-स्वरूपाचे नाव टाकून विश्वरूपाच्या निमित्ताने अनेक रूप धारण केले. ।। २ ।। हा अविट आत्मा सरळच देहादिकाने आकाराला आला व त्याचे स्मरण करताच तो आम्हास वैकुंठाचे सुख देत आहे ।।३।। श्रीनिवृत्तिनाथ त्या अक्षरतत्त्वाचीच प्रतिमा दुसरेरूप आकाश त्याचे प्रतिदिवशी एकत्वाची मर्यादा म्हणून ध्यान करावे ।।४।।