३४९ विश्वामाजी अक्षर क्षरले साचार
विश्वामाजी अक्षर क्षरले साचार । त्या रुपा आधार पुससी काई ॥ १ ।।
आपणची विश्व आपणचि विश्वेश । जेथे द्वैषाद्वेष मावळले ॥ २ ॥
निवृत्ति म्हणे ते रुप संतासमीप । ध्याती आपेआप वोसंडत ॥ ३ ॥
सरलार्थ:
जे सत्य अक्षर तत्त्व या विश्वामध्ये आले आहे त्या अक्षररूपास कोणता आधार आहे हे कशाला विचारतोस ।।१।। तो स्वतःच विश्व व विश्वाचा स्वामीहि असल्याने तेथे द्वेष व मैत्री नाहिसेच होऊन गेले आहे ॥२॥ निवृत्तिनाथ म्हणतात – ते अक्षररूप संतांच्या जवळ असून तेच उसळत असल्याने सहजच ध्यान घडते आहे ||३||