०२५ नघडुनिया दृष्टि नामा पाहे पोटी
नघडुनिया दृष्टि नामा पाहे पोटी ।
आनंदाची सृष्टि तया जाली ॥ १ ॥
घेरे नाम्या कवळु आनंदाचा होसी ।
तुजमाजि निवासि हरि आहे ॥ २ ॥
नामा पसरी मुख आनंदला तृप्त ।
कवळु पूर्णभरित हरिराज ॥ ३ ॥
निवृत्तीने सेविला कवळु हा हरि ।
तूंचि चराचरीं दिससी आम्हां ॥ ४ ॥
सरलार्थ:
आपली दृष्टी न उघडताच नामदेवाने आपल्या आंत पाहिले तेव्हा त्यास आनंद झाल्याचा अनुभव आला. ।।१।। नामा तू हा घास घे त्यामुळे तू आनंदरूपच होशील कारण तुझ्यामध्येच श्रीहरि राहात आहे. ।।२।। नामदेवाने आपले मुख उघडून तो काल्याचा कवळ-घास घेतला व त्या आनंदाने तो तृप्त झाला सर्व विश्वसम्राट श्रीहरि पूर्ण घास नामदेवाच्या मुखात भरवू लागले. ।।३।। निवृत्तिने हा अद्वैत काल्याचा घास सेवन केला त्यामुळे चराचरात आम्हाला तूंच दिसत आहे असे ते श्रीहरिस म्हणाले. ।।४।।
भावार्थ:
सृष्टी त्यांना आनंदाची भासते. निवृत्तिनाथ नामदेवांना भानावर आणुन काल्याचा घास घेण्यास सांगतात. हा एकात्म काला घेऊन तुझ्यात निवास करत असलेल्या परमात्माचे दर्शन घेण्यास सुचवतात. त्या आनंदात नामदेव आपले मुख पसरतात व देव त्यांना काल्याचा घास भरवतो.निवृत्तिनाथ म्हणतात देवांने त्या काल्याचा घास मला दिल्यावर ब्रह्मैक्य चराचराचे दर्शन मला एकत्वाने झाले.