०२७ सत्यभामा माये अन्नपूर्णा होये

सत्यभामा माये अन्नपूर्णा होये ।
वेळोवेळां सूये कवळू मुखीं ॥ १ ॥
राहीरखुमाई आदिमाता मोहे ।
नामा तो उपायें बुझाविती ॥ २ ॥
घेरे नाम्या ग्रास ब्रह्मीचा गळाला ।
आवडसि गोपाळां प्रीतीहूनी ॥ ३ ॥
कुर्वाळितो हरि नुघडी तो दृष्टी ।
सप्रेमाच्यां पोटी अधिक होसी ॥ ४ ॥
धरूनि हनुवटी पाहे कृपादृष्टी ।
आनंदाचे सृष्टि माजि नामा ॥ ५ ॥
निवृत्ति ज्ञानदेव सोपान चांगा हरि ।
यांसी परोपरी कवळू देतु ॥ ६ ॥

सरलार्थ:

सत्यभामा माता तर नामदेवासाठी अन्नपूर्णाच होऊन वारंवार त्याच्या मुखात घास घालत होती. ।।१।। राही, रुखमाई या आदि मात मोहाने विविध मार्गाने नामदेवाची समजूत घालीत होत्या. ।। २ ।। नामदेवा त हा घास घे तो ब्रह्मस्वरूपाचा घोट आहे. अतिप्रेमामुळे तूं श्रीहरि- गोपाळास आवडतो. ।।३।। प्रत्यक्ष श्रीहरिहि त्याच्या मुखावरून मायेने हात फिरवू लागला. तरीहि नामदेवाचे डोळे उघडेना कारण तो प्रेमाच्या डोहात बुडून गेला होता. ।।४।। मग त्याची हनुवटी धरून त्याच्याकडे श्रीहरिने कृपादृष्टीने पाहिले तेव्हा नामा आनंदाच्या विश्वात तल्लीन झाला होत. ।।५।। इकडे निवृत्ति, ज्ञानदेव व सोपान चांगदेव व हरि यांनी परस्परांना काल्याचे घास दिले. ।।६।।

भावार्थ:

प्रत्येक संतांच्या तोंडात काल्याचा प्रसाद भरवताना सत्यभामेने जणु अन्नपूर्णेचे रुप घेतले होते. नामदेवाच्या मोहाने राहिरखुमाबाई त्यांना भानावर आणण्यासाठी अनेक उपाय करु लागल्या.दोघी अत्यंत लडिवाळपणे नामदेवांना तो ब्रह्मरस काल्याचा घास घे म्हणुन सांगत आहेत. त्या भगवंताने तुला कुरवाळल्यामुळे तुझी भावसमाधी जास्त दृढ झाली असुन तु त्यामुळे डोळे उघडत नाहीस.पुन्हा देवाने नामयाच्या हनुवटीला धरुन त्याला कृपादृष्टीने पाहिले. त्या प्रेमामुळे नामदेवराय आनंदाच्या सृष्टीत निमग्न झाले. निवृत्तिनाथ म्हणतात मला, ज्ञानदेवांना, सोपानदेवांना, चांगदेवांना परिपूर्ण काला दिला.

Leave a Reply 0

Your email address will not be published. Required fields are marked *