०१ निवृत्तिराज ह्मणे भलें केलें देवा
निवृत्तिराज ह्मणे भलें केलें देवा । आतां जी केशवा सिद्ध व्हावे ।। १ ।।
निवृत्तिदास म्हणे सहजासहजी हरी । बोळविलीं सारी सुखधामा ॥ २ ॥
दाही दिशा चित्त झालें असे सैरा । आतां शारंगधरा सिद्ध व्हावें ॥ ३ ॥
आतां माझे श्रम नको घेऊं हरी । जावें त्र्यंबकेश्वरी समाधीसी ॥ ४ ॥
फार माझा प्राण आला कसे कंठीं । आतां जगजेठी सिद्ध व्हावें ॥ ५ ॥
नामा म्हणे देवा दिवस नाहीं आतां । त्वरें वेगीं संता सिद्ध करा ॥ ६ ॥