०४ अविट बोलणें बोलावें अनादि
अविट बोलणें बोलावें अनादि । जें गुह्य वेदीं सांपडेना ॥ १ ॥
कीर्ति वैराग्य केलें साम्राज्य । गुरुत्त्वासी लाज नाहीं आली ॥ २ ॥
नाशिवंत शरीर केलें अविनाश । घडविला विलास आध्यात्मींचा ॥ ३ ॥
अविट बोलणी आठवती मनीं । आतां त्रिभुवनी दिसेनात ॥ ४ ॥
तुझ्यामुळें हरि चालतो उगला। देहा आधीं गेला प्राण माझा ॥ ५ ॥
नामा म्हणे देवा करिता ऐसा घोर। सांडील शरीर निवृत्तिराज ॥ ६ ॥