०२९ वैष्णवांचा मेळा सकळ मिळाला

वैष्णवांचा मेळा सकळ मिळाला ।
विठ्ठलनामकाला पंढरीसी ॥ १ ॥
हरिनामा विनट हरि उच्चारीत ।
सप्रेम डुल्लत भक्तजन ॥ २ ॥
चालिला सोपान ज्ञानदेव निधी ।
मुक्ताई गोविंदीं तल्लीनता ॥ ३ ॥
निवृत्ति खेचर परसा भागवत ।
आनंदे डुल्लत सनकादीक ॥ ४ ॥

सरलार्थ:

असा सर्व वैष्णवांचा समुदाय एकत्र होऊन पंढरिक्षेत्रात विठ्ठल नामाचा काला झाला. ।।१।। (नाम, नामी परमात्मा व नाम घेणारे भक्त एकरूप झाले. हाच तो काला होय) सुंदर असे ते हरिनाम हरि हरि असा उच्चार करून सर्व भक्त प्रेमाने डुलत होते. ।।२।। सोपान काका, ज्ञानाचा साठा असे ज्ञानदेव व गोविंद स्वरूपी एकरूप असलेली मुक्ताबाई काल्याने तृप्त होऊन चालु लागले. ।।३।। निवृत्ति, विसोबा खेचर, परसा भागवत व सनकादिकहि या काल्याच्या सोहळ्याने झालेल्या आनंदाने डोलू लागले. ।।४।।

भावार्थ:

पंढरीत सर्व संतांनी एकत्र येऊन देव विठ्ठल व देवाचे नाम यांना एकत्र करुन काला केला.सप्रेमाने घेतलेल्या हरिनामाने डुल्लत असलेले भक्त त्या नामात तल्लीन झाले. हरिनामात तल्लिन झालेले सोपानदेव व ज्ञानदेव काल्याच्या दिंडीत मुक्ताई सह चालताना तल्लीन झाले आहेत.निवृत्तिनाथ म्हणतात मी स्वतः, विसोबा खेचर, परसा भागवत, सनक, सनंदन, सनातन, व सनत्कुमार हे ह्या आनंदात डुल्लत आहेत.

Leave a Reply 0

Your email address will not be published. Required fields are marked *