०३० पांडुरंग हरि माजी भक्तजन
पांडुरंग हरि माजी भक्तजन ।
कैसें वृंदावन शोभतुसे ॥ १ ॥
ब्रह्मादिक ठेले विमानें अंबरीं ।
काला तो गजरीं पंढरिये ॥ २ ॥
सनकादिक देव देहुढापाउलीं ।
गोपाळ वांकुली दाविताती ॥ ३ ॥
पुंडलिका नाचे देवमुनी सर्व ।
भीमातीरीं देव प्रगटले ॥ ४ ॥
ज्ञानदेव सोपान विसोबा खेंचर ।
नरहरि सोनार नाचताती ॥ ५ ॥
निवृत्ति मुक्ताई चांगदेव गाढा ।
हरिचा पवाडा झेलिताती ॥ ६ ॥
सरलार्थ:
सर्व बाजुने भक्तजन व मध्ये पांडुरंग परमात्मा ती शोभा कशी वृंदावनाप्रमाणे दिसत होती. ।। (कोळम्याचा गोलाकार व मध्ये तुळशी ही शोभा जशी असते तसे ते दर्शन घडत होते) काल्याचा घोष पंढरित चालु होता ब्रह्मा व देवादिकांची विमानेही जेव्हा आकाशात थांबली. ।।२।। सनकादिक संत व आपल्या दिड पायाने म्हणजे एक पाय वाकडा करून उभा असलेला श्रीहरि आणि सर्व गोपाळ या स्वर्गातील देवांना वाकुल्या दाखवू लागले. ।।३।। पुंडलिक, देवमुनी नारद, अन्य देवता, ऋषी-मुनी, हे सर्व भीमेच्या तिरावर देवासह प्रगट नाचु लागले. ।।४।। तसेच ज्ञानदेव, सोपान, विसोबा खेचर, नरहरी सोनार, हेहि नाचत होते ।।५।। निवृत्ति मुक्ताई व तो मोठा चांगदेव श्रीहरिचा पोवाडा-पराक्रम गाऊ लागले. ।।६।।
भावार्थ:
पांडुरंग व त्याचे नाम घेत येणारे भक्त यांच्या मुळे पंढरी वृंदावन क्षेत्रा सारखी शोभत आहे. तो हरिनामाच्या गजरात होणारा काला पाहायला पंढरीत ब्रह्मादिकांच्या विमानांची गर्दी झाली आहे. सनकादीक भक्त व एका पायावर दुसरा पाय वाकडा ठेऊन देव त्या ब्रह्मादिकांना वाकुल्या दाखवत आहे. हरिनामाच्या गजरात नाचणाऱ्या पुंडलिकाला पाहुन ते सर्व देव पंढरीत प्रगट होऊन नाचु लागले.तसेच ज्ञानदेव, सोपान, विसोबा खेचर, नरहरी सोनार हे सर्व संत ही नाचु लागले. निवृत्तिनाथ म्हणतात ते स्वतः, मुक्ताई व चांगदेव हरिनामात रंगुन गेले.