२०. नारा महादा गोंदा विठा झाला विकळ
नारा महादा गोंदा विठा झाला विकळ । झांकियेली शीळ समाधीची ॥ १ ॥
गंधर्व आणि देव चिंतावले भारी । दीर्घ ध्वनि करी नारा विठा ॥ २ ॥
गोंदा आणि महादा सांडिती शरीर । विसोबा खेचर फार कष्टी ॥ ३ ॥
लोपलासे भानु पडला अंधार । गेला योगेश्वर निवृत्तिराज ॥ ४ ॥
गेल्या त्या विभूति अनादि अवतार । आतां देवा फार आठवतें ।। ५ ।।
नामा म्हणे हरि धरवेना धीर । येती गहिंवर वोसंडोनी ॥ ६ ॥