२५. काय म्यां बोलावें किती माझी मती
काय म्यां बोलावें किती माझी मती । तुह्मी रमापति गोड केलें ॥ १ ॥
विश्वरूप घडी उघडिली धडफुडी । आतां काय थोडी कृपा म्हणूं ॥ २ ॥
चिन्मय लहरी येती उन्मळुनी । दया नारायणीं थोर केली ॥ ३ ॥
समाधि चरित्र केलें यथामती । रखुमाईचा पति आर्जविला ॥ ४ ॥
समाधिचरित्र जो करील श्रवण । तयालागीं येणें वैकुंठीचें ॥ ५ ॥
नामा म्हणे देवगुरू धरील चित्तीं । उद्धरील पति रुक्माईचा ॥ ६ ॥