०३८ नीट पाठ आम्हां धीट हा प्रबंध

नीट पाठ आम्हां धीट हा प्रबंध ।
जन वन बोध ब्रह्मरसें ॥१॥
तें मेघःशाममूर्ति स्वरूप गोजिरी ।
गोकुळींची चोरी करि कृष्ण ॥२॥
मुद्दल शामळ नित्यता अढळ ।
अखंड अचळ स्वरूप ज्याचें ॥३॥
निवृत्ति पुरता गुरु विवरण ।
गयनीची खूण आगमरूपें ॥४॥

सरलार्थ:

जनावनांत ब्रह्मानंदाचा बोध-ज्ञान आम्हाला योग्य व धैर्यमुक्त पाठ देणारा ग्रंथ आहे ।।१।। तीच ही मेघा प्रमाणे सावळी मूर्ती, स्वरुपाने सुंदर असलेला कृष्ण गोकुळांत चोरी करीत आहे ।।२।। त्याचे मूळ रूप सावळे असले तरी स्वरूप मात्र अविनाशी आणि न ढळणारे आहे. ते अखंड-व्यापक न चळणारे असे आहे ।।३।। निवृत्ति हा गुरु वर्णनाने पूर्ण असून गहिनीनाथाचे रहस्य शास्त्रानुसारच त्याचेकडे आले आहे ।।४।।

भावार्थ:

सर्व जगता मध्ये तो परमात्मा एक रसाने व्यापला आहे तो परमात्मा आपला विस्तार प्रबंधात्मक रुपाने बोध करुन देत आहे. तोच परमात्मा ढगाच्या रंगाचे सावळे सगुण रूप घेऊन गोकुळात चोरी करतो. असे सतत नित्य, अखंड, अचळ, अढळ असे स्वरूप काळा जसा शूद रंग म्हणजे दुसरा रंग मिसळा तरी सावळेपण न सोडणारा आहे. निवृत्तिनाथ म्हणतात श्री गुरु गहिनीनाथा मुळे पुर्ण स्वरूप असलेले वेदाना आगम्य असलेले परमात्म स्वरुप मला समजले.

Leave a Reply 0

Your email address will not be published. Required fields are marked *