०४४ मंगल मांगल्य ब्रह्म हें सखोल

मंगल मांगल्य ब्रह्म हें सखोल ।
ब्रह्मरूपें खोल ब्रह्म भोगीं ॥१॥
तें हें कृष्ण नाम वोळलें त्या नंदा ।
आनंदें यशोदा गीत गात ॥२॥
विश्वाद्य वेदाद्य श्रुतीसी अभेद्य ।
तें ब्रह्मपणे वंद्य ब्रह्म भोगी ॥३॥
ॐकार मूर्धनि प्रणव प्रणम्य ।
वेदादि आगम आंगभूत ॥४॥
निराळ वैकुंठ निराकार धीट ।
निगम एकट ब्रह्मपणें ।।५।।
निवृत्ति परिवार गुरु गयनी अमर ।
गोरक्षीं कंदर ब्रह्म माझें ॥६॥
सरलार्थ:
पवित्रात पवित्र व गहन असे हे ब्रह्म तद् रुप होऊन त्याचा भाग आम्हास घडत आहे ।।१।। ते हे कृष्ण रुपानामासह नंदावर प्रसन्न झाले आहे. त्या आनंदाने माता यशोदा गाणे गात आहे ।।२।। सर्व विश्व व वेदाचाहि आदि असे श्रुतिहि त्याचे रहस्य जाणू शकत नाही. ते ब्रह्मरुपानेच ब्रह्माचा भोग घेत आहे ।।३।। मूर्धन्याकाशात प्रणवास प्रणाम करत वेद व शास्त्रे ज्याचे प्रतिपादन करीत आहेत ।।४।। निर्मळ असे वैकुंठ निराकार स्वरुपी धीटपणे ब्रह्मस्वरुपी ब्रह्म होऊन प्रवेश करीत आहेत ।।५।। श्रेष्ठ असे गोरक्ष व गहिनीश्रीगुरु निवृत्ति परिवार आहे. यांनी मला अमर ब्रह्मस्वरुप दिले आहे. ।।६।।
भावार्थ:
ते हे ब्रह्म सर्व मंगलाचे मांगल्य असुन योगी सखोल चिंतन करुन ह्याचे ब्रह्मपण भोगतात तेच परब्रह्म कृष्ण नाम घेऊन नंदाच्या घरी आवतरले व त्यामुळे गीत गाऊन यशोदा आनंद व्यक्त करते. जे वेदांचे आद्य, जे विश्वाची सुरवात जे श्रुतीला अभेद्य असलेले ब्रह्म त्याच्याशी समरसुन योगी त्याचा भोग घेतात. ॐ कारचे ध्यान सहखदळ चक्राचे अंतर्गत मूर्ध्नि स्थानी करतात. ॐ कार स्वरुप होऊनच ॐकाराचे ध्यान करावे. व ते करण्यासाठी वेद किंवा इतर ग्रंथानी त्या ब्रह्मस्वरुपाचे वर्णन केले आहे त्याचे चिंतन करुन केले तर फलद्रूप होते. वेदांनी वर्णन केलेले हे अद्वैत ब्रह्म निराकार असुन ते एकटे आहे. निवृत्तिनाथ म्हणतात ज्या गुरुनी मला अमरत्व दिले त्यांनी व गोरक्षनाथांनी ज्या निगमस्थानी रहिवास केला तेथेच मी ही त्यांच्या सोबत राहिलो.