०५४ प्रतिपाळ संप्रतिज्ञेचा नेम

प्रतिपाळ संप्रतिज्ञेचा नेम ।
सर्वज्ञता तम गिळीतसे ॥१॥
तें रूप सकुमार गोपवेषधर ।
सर्वज्ञ साचार नंदाघरीं ॥२॥
त्रिपुर उदार सर्वज्ञता सूत्र ।
नाम रूप पात्र भक्तिलागीं ॥३॥
निवृत्ति संपदा सर्वज्ञ गोविंदा ।
सूत्रमणी सदा तेथें निमो ॥४॥

सरलार्थ:

प्रतिज्ञेचे पालन करणे हा ज्याचा नेम आहे व ज्याची सर्वज्ञता अज्ञान अंधकारास-तमास गिळून टाकते ।।१।। ते कोमलरूप गवळ्याचा वेष धारण करून सर्वज्ञ व सत्यरूपाने नंदाचे घरी नांदत आहे ।।२।। पुरत्रय-तीन शरीरांत नांदणाऱ्या जीवाकरीता उदार व सर्वज्ञतेचे सूत्र धारण करणारा; परंतु भक्तिसाठी नामरूपास पात्र झाला ।।३।। सर्वज्ञ श्रीहरि गोविंद ही निवृत्तिनाथांची संपत्ति आहे. ईश्वरीय सूत्र त्यांत गोवलेले विश्वात्मक मणि-जगत-त्यांतच विलीन होवो समरस होवो ।।४।।

भावार्थ:

तो परमात्मा अज्ञानरुपी अंधकाराचा ग्रास घेऊन भक्तांचे रक्षण करण्याच्या प्रतिज्ञेला अनुसरून त्यांचे संरक्षण करतो. तेच सर्वज्ञ साचार असलेले स्वरूप गोपाळाचे रुप घेऊन आले आहे. त्रिपुरासुराला उदार होऊन सोन्यारुप्यालोहाची शहरे देणारा तो सर्वज्ञ असुन तो सुत्ररूपाने जगाचे धारण करतो. त्याच नामरूपांवर विश्वास असलेले त्याची भक्ती करतात. निवृत्तिनाथ म्हणतात तोच परमात्मा ब्रह्मांड माळेचा सुत्रमणी असुन त्याच्याशी मी एकरुप झालो.

Leave a Reply 0

Your email address will not be published. Required fields are marked *