०५६ आदिरूप समूळ प्रकृति नेम

आदिरूप समूळ प्रकृति नेम ।
वैकुंठ उत्तम सर्वत्र असे ॥१॥
तें रूप संपूर्ण वोळलें परींपूर्ण ।
सर्व नारायण गोपवेष ॥२॥
आधारीं धरिता निर्धारीं धरिता ।
सर्वत्र पुरता एकरूपें ॥३॥
निवृत्ति साधन सर्वरूपें जाण ।
एकरूपें श्रीकृष्ण सेवितसे ॥४॥

सरलार्थ:

मूळ स्वरूपासह आद्य अव्यक्तरूप जी प्रकृति तिच्यात सर्व ठिकाणी सर्वोत्तम वैकुंठ श्रीहरिच आहे ।।१।। ते श्रीहरि स्वरूप सर्व परिपूर्णत्त्वाने नारायण गोवळ्याच्या वेषात येथे आपणहून प्राप्त झाले आहे ।।२।। आधांतरी घेरले असता व निश्चयाने धरिले असता तो सर्वच ठिकाणी एकरूपाने पूर्ण आहे ।।३।। हेच निवृत्ति साधन आहे असे समजतो श्रीकृष्णाचे सर्वरूपात एकरूपाने सेवन करीत आहे. एकच श्रीहरि सर्वत्र भरला आहे याचा अनुभव घेत आहे ।।४।।

भावार्थ:

एकट्या परब्रह्माला जेंव्हा एकटेपण जाणवतो तेंव्हा तो प्रकृती तयार करून जगतरुपी वैकुंठ तयार करतो. तोच परमात्मा गायी गोपाळांच्या जागी अंशात्मक रुपाने आला व संपुर्ण जगाताचे रुप परिपुर्ण केले, योग्यांनी निर्धारानी धारण केलेल्या ध्यानातुन सर्वत्र तोच अनेक रुपाने प्रकट होतो. निवृत्तिनाथ म्हणतात तोच परमात्मा जरी अनेक रुपानी प्रगट झाला तरी श्रीकृष्ण रुपात त्याला एकत्वाने पाहता येते.

Leave a Reply 0

Your email address will not be published. Required fields are marked *