०५९ निरालंब सार निर्गुण विचार

निरालंब सार निर्गुण विचार ।
सगुण आकार प्रगटला ॥१॥
तें रूप सुंदर शंखचक्रांकित ।
शोभे अनंत यमुनातटीं ॥२॥
अपार उपाय आपणचि होय ।
सिद्धीचा न साहे रोळु सदा ॥३॥
सर्व हें घडलें कृष्णाचें सानुलें ।
घटमठ बुडाले इये रूपीं ॥४॥
सर्वसुखमेळे नामाकृती वोळे ।
सिद्धिचे सोहळे कृष्णनामीं ॥५॥
निवृत्ति तटाक घट मठ एक ।
कृष्ण हा सम्यकु नामरूपें ।।६।।

सरलार्थ:

आधाररहित पण साररूप, गुणरहित पण विचारघन असे हे सगुण साकाररूपाने प्रगट झाले आहे ।।१।। ते शंख चक्रादि चिन्हांनी युक्त असलेले सुंदर रूप श्री अनंत कृष्णरूपाने यमुनेच्या तिरावर शोभत आहे ।।२।। तो अनंत उपाय आपणच होतो व सिद्धिचा क्रम तो सदैवच सहन करीत नाही. कारण तो सिद्धच आहे. प्राप्तच असल्याने उपायहि त्याचेच रूप ठरते. उपायाच्या आदि मध्य व अंती आपणच होतो. साधनाच्या अगोदरच तो सिद्ध आहे म्हणून प्राप्त होण्याची वहिवाटच तो पडू देत नाही ।।३।। श्रीकृष्णाच्या लहानशा रूपात हे सर्व घडले आहे घट, मठ हे याच ठिकाणी एकरूप होतात ।।४ ।। या रूपात सर्व सुखाचा संगम होतो. नामानेच रूपहि प्राप्त होते व सिद्धिचे सोहळे होतात ।।५।। निवृत्ति या काठावर स्थिर आहे कि घट मठ हे एकरूपच असून नामरूपांनी तो कृष्णच चांगल्या रूपाने नटला आहे ।।६।।

भावार्थ:

जे परब्रम्ह कोणावर अवलंबुन नाही ते निर्गुण आहे ते सगुण होऊन साकारले. शंखचक्रगदा घेऊन ते सुंदर रुप घेऊन यमुना तटी आले. जो अपायांवर उपाय आहे. त्याकडे येण्यास अष्टमा सिध्दी ही स्वतःला रोखु शकल्या नाहीत. कृष्ण रुपात ज्या • लिला केल्या त्यामुळे भगवान लहान दिसत असले तरी अमर्याद शक्ती ठेऊन असतो. त्याच्या त्या सानुल्या रुपात घट मठादी सिध्दांत लोप पावले. हे कृष्ण नाम घेतलावर सर्व सुखाची प्राप्ती तसेच सर्व सिध्दी ही आपसुक मिळतात. निवृत्तिनाथ म्हणतात त्याच्या नामप्रभावामुळे घट व मठातील पोकळी ही भरते म्हणजे सिध्दांत सिध्द होतात. हे सामर्थ त्या कृष्ण नामात आहे.

Leave a Reply 0

Your email address will not be published. Required fields are marked *