०६२ निराकृती धीर नैराश्य विचार

निराकृती धीर नैराश्य विचार ।
परिपूर्ण साचार वोळलासे ॥ १ ॥
तें रूप रूपस सुंदर सुरस ।
तो पूर्ण प्रकाश गोकुळीं रया ॥ २ ॥
नानारूप हरपे दृश्य द्रष्टा लोपे ।
तो प्रत्यक्ष स्वरूपें नंदाघरी ॥ ३ ॥
निवृत्ति सादर निराकार अंकुर ।
साकार श्रीधर गोपवेष ॥ ४ ॥

सरलार्थ:

निराकार निर्विकार हे स्वरूप, आशारहित हा विचार व खरे पाहिले तर परिपूर्ण असा हा श्रीहरि गोकुळावर प्रसन्न झाला आहे. ।।१।। त्याचे ते रूप रूपवान, सुंदर व आनंदरूप असून त्याचा पूर्ण प्रकाश गोकुळांत आहे (असे आवडीने निवृत्तिनाथ प्रजेला सांगत आहेत ) ।।२।। जेथे नाना नाम-रूप हे नाहिसे होतात व दृश्य व द्रष्टा हे दोन्ही लोपून जातात तो प्रत्यक्ष स्वरूपाने नंदाच्या घरी आला ।।३।। निराकाराचा अंकुर असलेल्या, श्रीहरि रूपात साकारलेल्या गोपवेषधारी श्रीकृष्णाचे ठिकाणी निवृत्तिचा आदरभाव आहे ।।४।।

भावार्थ:

तो परमात्मा निराकार आशारहित तरी सर्व गुणानी परिपूर्ण होऊन अवतरला आहे. त्या सुंदर सुकुमार व सुरस रुपातुन प्रत्यक्ष प्रकाश होऊन गोकुळात आला आहे. जाच्या स्वरुपात अनेक रुप हरपतात दृष्यादृष्यत्व विलीन होते तो नंदा घरी कृष्णरुपात अवतरला आहे. निवृत्तिनाथ म्हणतात गोपाळ वेशात अंकुरलेला तो कोंभच कृष्णरुपातील साकार परमात्मा आहे.

Leave a Reply 0

Your email address will not be published. Required fields are marked *