०६५ जेथें रूप रेखा ना आपण आसका

जेथें रूप रेखा ना आपण आसका ।
सर्व रूपें देखा हरि माझा ॥ १ ॥
तें रूप गोजिरें नंदाघरीं असे ।
जनीवनीं दिसे गोपिकांसि ॥ २ ॥
नादभेद कळा जेथें भेद नुठी ।
ब्रह्मरूपें तुष्टि अवघी होय ॥ ३ ॥
निवृत्ति जन जन वन देख ।
आत्मरूपभाव ब्रह्म जाला ॥ ४ ॥

सरलार्थ:

ज्या ठिकाणी रूप किंवा रेषा-मर्यादा नाही व आपण संपूर्णपणे सर्व रूपाने माझा हरिच आहे ।।१।। ते सुंदर रूप नंदाघरी असून गोपीकांते जना वनात सर्वत्र दिसते ।।२।। जेथे नाद, भेद, कळा (आवाज, प्रकार, तेज) आवाजांचे प्रकार, तेज आदि विभाग जेथे उत्पन्न होत नाहीत. सर्व ब्रह्म स्वरूपाने संतुष्टता प्राप्त होते ।।३।। निवृत्तिनाथ त्याला जनात व वनात पाहतो त्याचा आत्मभाव ब्रह्मस्वरूप झाला आहे ।।४।।

भावार्थ:

ज्या रंग नाही. रुप नाही. असा जो माझा हरि आहे. तोच सर्वत्र सर्व रुपानी नटला आहे. तोच परमात्मा नंदा घरी सगुण रुपात आल्यावर त्या गौवळणी येवढ्या मुग्ध झाल्या की जना वनात त्याला त्याच रुपात म्हणजे कृष्ण रुपात पाहु लागल्या. ज्याच्या मध्ये ध्वनीचे नाद किंवा भेद नाहीत तो अभेद असुन त्यांने ह्या कृष्णब्रह्मरुपात सृष्टीची तृषा तृप्त केली आहे. निवृत्तिनाथ म्हणतात त्याच्या त्या रुपाने माझा आत्मभाव त्याच्याशी एकरुप झाला म्हणुन मी जनी विजनी त्यालाच पाहात आहे.

Leave a Reply 0

Your email address will not be published. Required fields are marked *