०६७ विश्वातें ठेऊनि आपण निरंजनी

विश्वातें ठेऊनि आपण निरंजनी ।
नामाची पर्वणी भक्तांलागी ॥ १ ॥
तें रूप संपूर्ण वसुदेवाकुळीं ।
यादव गोपाळीं वोळलासे ॥ २ ॥
व्यापकपण धीर ब्रह्मांड साकार ।
तें रूप तदाकार भाग्ययोगें ॥ ३ ॥
निवृत्ति घनवट आपण वैकुंठ ।
कृष्णनामें पेठ गोकुळीं रया ॥ ४ ॥

सरलार्थ:

ज्याने आपण स्वतः निर्विकल्प स्थितीत राहून भक्ताकरिता पवित्र अशी नामे जगात ठेविली आहे. ।।१।। ते संपूर्ण रूप वसुदेवाच्या कुळांत व यादव वंशातील गोपाळास प्राप्त झाले आहे ।।२।। व्यापकपणाने निर्विकार व ब्रह्मांडरूपाने आकारयुक्त झालेल्या त्या रूपाशी दैवयोगानेच तदाकार, एकरूप होता येते ।।३।। निवृत्तिनाथ म्हणतात – तो वैकुंठरूप श्रीहरि आपण सर्व विश्वात दाटीवाटीने भरून कृष्णरूपाने पेठच वसविली आहे ।।४।।

भावार्थ:

विश्वाची निर्मिती केल्यावर निरंजनी राहिलेल्या ह्या परमात्माच्या नामाची पर्वणी नामसाधना करुन भक्त साधतात. तोच परमात्मा वसुदेवाच्या कुळात जन्मुन यादवकुळी गोकुळात राहिला गेला. ह्या विश्वाचा आधार तो परमात्मा असुन तो तदाकार रुपाने प्रतित होतो. निवृत्तिनाथ म्हणतात त्या घनवट परमात्माने कृष्णनाम योगाने गोकुळात वैकुंठ पेठ निर्माण केली.

Leave a Reply 0

Your email address will not be published. Required fields are marked *