०६९ त्रिभंगी त्रिभंग जया अंगसंग
त्रिभंगी त्रिभंग जया अंगसंग ।
एकरूप सांग वोघवतसे ॥ १ ॥
तें रूप सावळें भाग्ययोगें वोळे ।
नंदाचे सोहळे पाळियेले ॥ २ ॥
श्रुतिप्रतिपाद्य शास्त्रांसि जें वंद्य ।
निर्गुणाचें आद्य भाग्यनिधि ॥ ३ ॥
निवृत्ति नितंब रूपस स्वयंभ ।
कृष्णनामें बिंब बिंबलेंसे ॥ ४ ॥
सरलार्थ:
तीन ठिकाणी असलेल्या श्रीकृष्णाच्या स्वरूप संगतीने (मान, कंबर व पायात वाकुडा) (देहुडा) त्रिभंग स्थूल, सूक्ष्म व कारण या तीन देहाचा भंग निरास होतो व एक परब्रह्म स्वरूप असा पूर्ण बोधाने वावरत असतो ।।१।। ते सावळे स्वरूप परमभाग्यानेच प्राप्त होते त्याने नंदाचे सर्व मनोरथ पूर्ण केले ।।२।। जो श्रुति ज्ञानपर वेदाचा प्रतिपादन करण्याचा विषय असून शास्त्रांस वंद्य आहे. निर्गुणाच्याहि अगोदरचे आहे. कारण निर्गुण सगुण या कल्पनांच्याहि अगोदर तो स्वसत्तेने अस्तित्वात होता असा भाग्याचा सांठाच आहे ।।३।। निवृत्तिनाथ म्हणतात कंबरेच्या भागाने तो स्वाभाविक रूपवान- सुंदर आहे. कृष्णाच्या रूपाने तो बिंबाकारच साकार झाला आहे ।।४।।
भावार्थ:
जरी कृष्ण रुपात तिन ठिकाणी वाकडा देहुडा असलेला परमात्मा मात्र एकात्मरुपाने जगात आहे. ते सावळे सुंदर कृष्ण रुप दैवयोगाने नंदाला प्राप्त झाले आहे. व ते नंदाचा आनंद द्विगुणित करत आहे. ज्याचे वर्णन करायचा प्रयत्न वेद व शास्त्र करतात जो वेदांना वंद्य आहे. ते निर्गुण गणातीत स्वरुप आहे. निवृत्तिनाथ म्हणतात त्या पितांबरधारी सुंदर रुपाने माझा अंतःकरणाला व्यापले आहे.