०७१ विकट विकास विनट रूपस

विकट विकास विनट रूपस ।
सर्व ह्र्षिकेश दिसे आम्हां ॥ १ ॥
तें रूप साजिरें नंदाचें गोजिरें ।
उन्मनिनिर्धारे भोगूं आम्हीं ॥ २ ॥
विलास भक्तीचा उन्मेखनामाचा ।
लेशु त्या पापाचा नाहीं तेथें ॥ ३ ॥
निवृत्ति म्हणे तें सुखरूप कृष्ण ।
दिननिशीं प्रश्न हरि हरि ॥ ४ ॥

सरलार्थ:

हिडिसपणाचा विलास व खेळात रमविणारे रूप अशा सर्व रूपाने आम्हास ऋषीकेश परमात्माच दिसतो ।। ते सुंदर व नाजुक असे नंदाचे आवडते रूप उन्मनिच्या निश्चयाने आम्ही भोगू ।।२।। भक्तिचा विलास व नामाचे ज्ञान असे ते रूप असून जेथे पापाचा लवलेश नाही ।।३।। निवृत्तिनाथ म्हणतात ते कृष्णरूप सुखस्वरूप कृष्णाचे रूपडे हा आमचा दिवस रात्रीचा विषय झाला आहे. ।।४।।

भावार्थ:

ह्य जगतात काही रुप विक्राळ, प्रचंड, कुरुप आहेत. व काही रुप सुंदर साजिरी असली तरी ती सर्व एकत्वाने त्या हृषिकेश रुपात एकवटली आहेत. पण सुंदर शोभिवंत असे नंदाच्या घरी अवतरलेले कृष्ण रुप आम्ही उन्मनी अवस्थेत भोगत आहोत. असे रुप ज्याच्या मनात संचरते त्याच्या मनात पापाचा लवलेशही राहात नाही. निवृत्तिनाथ म्हणतात तोच सुखरुप असलेला परमात्मा कृष्णरुपनामाने हृदयातील नामरुप प्रश्नांचे नामरुप उत्तर होतो.

Leave a Reply 0

Your email address will not be published. Required fields are marked *