०७२ गगनाचिये खोपे कडवसा लोपे

गगनाचिये खोपे कडवसा लोपे ।
क्षरोनियां दीपें दृश्यद्रष्टा ॥ १ ॥
तें वोळलें गोकुळीं वसुदेवकुळीं ।
पूर्णता गोपाळीं गोपीरंगी ॥ २ ॥
जिवशिवसीमा नाहीं जेथें उपमा ।
हारपे निरोपमा तया माजी ॥ ३ ॥
निवृत्ति तत्पर वेदांचा ॐकार ।
ॐतत्सदाकार कृष्णरूपें ॥ ४ ॥

सरलार्थ:

आकाशाच्या पोकळीत पडछाया नाहिसी होते तसे ज्याच्या प्रकाशात दृश्य व द्रष्टा हे दोन्ही क्षीण होऊन जातात ।।१।। ते गोकुळांत वसुदेवाच्या कुळामध्ये गोपाळ व गोपींच्या प्रेमरंगात पूर्णत्त्वाने प्राप्त झाले आहे ।।२।। ( प्रेमाने रंगुन गेले आहे.) ज्या ठिकाणी जीव व शिव या मर्यादा व कोणतीही उपमा नाही. इतकेच काय पण उपमानापेक्षा उपमारहित निरूपमत्वहि नाहिसे होते ।।३।। निवृत्ति वेदाचा आद्य असलेल्या ओंकाराचे ठिकाणी सावध आहे. ॐ तत्-सद् या तीनही स्वरूपाने परब्रह्म रूपाने साकार झाले आहे ।।४।।

भावार्थ:

गगनाच्या घरात कवडसा पडण्याच्या जसा योग नसतो तसा दृष्य, द्रष्टा व दृष्यत्व ह्या त्रिपुटीचा लय त्याच्या रुपात होतो. त्याच रुपात ते गोपाळ व गौवळणी रममाण झाले. ते गोकुळात वसुदेवकुळातुन आले. ज्याला जीवशिवाची सिमा नाही कोणतीही उपमा नाही किंबहुना सर्व उपमा त्या रुपाच्या ठिकाणी संपतात निवृत्तिनाथ म्हणतात वेदांची सुरवात असणारा ओंकार, तोच त्या कृष्णरुपाशी तदाकार आहे त्यात मी निमग्न आहे.

Leave a Reply 0

Your email address will not be published. Required fields are marked *